मुंबई – २०२१च्या अपंगाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल.

मुंबई [] नुकताच अपंगांच्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसह सर्व क्रीडाप्रेमींसाठी शुक्रवारचा दिवस आनंदाचा ठरला. २०२१च्या अपंगाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला बहाल करण्यात आल्याचे संघ संचालक विनोद देशपांडे यांनी जाहीर केले.

गेल्या महिन्यात अपंगांच्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने  यजमान इंग्लंडलाच ३६ धावांनी धूळ चारून विजेतेपद मिळवले होते. मुंबईत शुक्रवारी या विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी आणि  माजी क्रिकेटपटू करसन घावरी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.