नवी दिल्ली –  गुरू रविदास मंदिरासाठी सामंजस्याने पर्यायी जागा शोधून प्रस्ताव  सादर करावा

नवी दिल्ली [] गुरू रविदास मंदिरासाठी सामंजस्याने पर्यायी जागा शोधून त्याबाबतचा प्रस्ताव  सादर करावा असे सर्वोच्च न्यायालयाने यातील संबंधित पक्षकारांना सांगितले. दिल्लीच्या तुघलकाबाद जंगलात हे मंदिर उभारू देण्याची मागणी संबंधितांनी केली होती.  आता या प्रकरणाची सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दिल्ली विकास प्राधिकरणाने न्यायालयाच्या आदेशानंतर संत रविदास मंदिर पाडून टाकले होते. न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वाच्या धार्मिक भावनांचा आम्हाला आदर आहे पण त्याचबरोबर कायद्याचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.

न्या. अरूण मिश्रा, न्या. एस.रवींद्र भट यांनी सांगितले की, यातील सर्व पक्षकारांनी सामंजस्याने मंदिरासाठी  पर्यायी जागा शोधावी. त्यानंतरच आम्ही आदेश जारी करू शकू.

न्यायालयाच्याच आदेशानुसार पाडण्यात आलेले मंदिर परत उभारण्यासाठी कलम ३२ अन्वये दाखल करण्यात आलेली याचिका आम्ही विचारात घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. संसदेचे माजी सदस्य असलेल्या अशोक तनवर व प्रदीप जैन यांनी याचिका दाखल केली होती. त्यात धार्मिक  श्रद्धा जपण्याच्या अधिकारानुसार मंदिर पुन्हा बांधण्याची मागणी केली आहे. तुघलकाबाद येथील समाधी मंदिर पाडण्यात आल्याने धार्मिक श्रद्धा अनुसरण्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.