दहशतवादी संघटना देखील भारतविरोधी कारवाया करण्यासाठी सक्रीय झाल्याची माहिती समोर.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून चवातळलेल्या पाकिस्तानच्या बरोबरीने दहशतवादी संघटना देखील भारतविरोधी कारवाया करण्यासाठी अधिकच सक्रीय झाल्या असल्याचे दिसत आहेत. पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतात घातपात घडवण्यासाठी या दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, पाकिस्तानी सेना व आयएसआयच्या मदतीने लश्कर ए तैयबा (एलइटी), हिजबुल मुजाहिद्दीन(एचएम) आणि जैश ए मोहम्मद (जेएम) या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरसह भारताच्या अन्य काही भागात दहशतवादी कारवायांसाठी एकत्र येत जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.

मागील आठवड्यात पुलवामा येथे या दहशतवादी संघटनांची एक बैठक पार पडली. या बैठकीत भारतातील कारवायांसंदर्भात जबाबदाऱ्या आपसात वाटून घेण्यात आल्या आहेत.
गुप्तचर संस्थांकडून प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानचे पाठबळ असलेल्या या दहशतवादी संघटनांना जम्मू-काश्मीरसह भारतातील काही भागात हल्ले करणे, याचबरोबर पोलीस कर्मचारी व राजकीय नेत्यांची हत्या घडवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘जेएम’ वर राष्ट्रीय महामार्गावर हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ‘एलइटी’ ला अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सांगितले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनवर काश्मीर खोऱ्यात बंद घडवण्याबरोबरच पोलीस व नेत्यांची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती मिळालेली आहे.

 

All News