सांगली – ज्या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली [] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जाहीर सभेत आभार मानले आहेत. आमचे काम राहुल गांधी करत आहेत. राहुल गांधी यांची सभा ज्याठिकाणी होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीमधील भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ आज वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, भाजपा उमेदवार शिवाजीराव नाईक, भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आज विरोधी पक्षातील दोन्ही मुख्य पक्षाची अवस्था काही खरी नाही. राहुल गांधी हे महाराष्ट्रात येऊन सभेत बोलताना 70 वर्षे तुमच्यावर अन्याय झाले, असं सांगत आहेत. पण ते विसरले 65 वर्षे त्यांची सत्ता होती. पण चांगलेच आहे, राहुल गांधी आमचे काम करत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचे मी आभार मानतो आणि राहुल गांधी यांची जिथे सभा होते, तिथे आम्ही नक्की जिंकतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.