प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) बजावण्यात आलं समन्स

मुंबई [] माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीसोबत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने २१ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाआधीच १८ ऑक्टोबरला प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत आपले इक्बाल मिर्चीसोबत कोणतेही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी आपलं कुटुंब तसंच ‘मिर्ची’ नावाने कुख्यात असलेल्या इक्बाल मेमन यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारावर स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या व्यवहारावरुन आरोप करण्यात येत आहेत, तो व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. जमिनीचा इतिहास सांगताना प्रफुल्ल पटेल यांनी कशाप्रकारे ही वादग्रस्त जमीन १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम के मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इक्बाल याला विकण्यात आली असल्याचं सांगितलं. “२००४ रोजी इक्बाल मेमनसोबत जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इक्बाल मेमनवर आरोप होते, तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये एका अहवालाची थोडीशी माहिती आली आहे. प्रत्येकाला आपल्याला वाटेल तसा अर्थ काढण्याचा अधिकार आहे. मी निवडणूक प्रचारात होतो. पण प्रसारमाध्यमांमध्ये येत-जात होतो, पण स्पष्टीकरण देण्यासाठी प्रचार सोडून यावं लागलं आहे,” असं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. दरम्यान ईडीने जमिनीच्या या व्यवहारासंबंधी प्रफुल्ल पटेल यांना नोटीस बजावली असून १८ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.