शाश्वत जल व्यवस्थापन परिषदेची पूर्वपिठीका

नवी दिल्ली [] भारतासाठी पाणी हे महत्वाचे संसाधन आहे. भारतात जगाच्या लोकसंख्येपैकी 18 टक्के लोकसंख्या असली तरी भारतात जागतिक जलस्रोतांपैकी केवळ 4 टक्के स्रोत आहेत. या क्षेत्रातल्या समस्यांचा सामना करण्याची तसेच मौल्यवान जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे. भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय याबाबत शाश्वत विकास तसेच जलस्रोतांचे व्यवस्थापन या क्षेत्रात कार्य करत आहेत. जल शक्ती मंत्रालय राज्यांच्या सक्रिय सहकार्याबरोबरच अनेक योजना राबवत आहे आणि राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प हा त्यापैकीच एक आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय केंद्र सरकारचा हा प्रकल्प राबवत आहे.  राष्ट्रीय पातळीवर हा प्रकल्प राबवला जात असून यामध्ये पाणी स्रोतांची आकडेवारी, साठवण, व्यवस्थापन आदींबाबत प्रणाली तयार केली जात आहे.

जलस्रोत व्यवस्थापन क्षेत्रातील राज्य तसेच केंद्र सरकारच्या संस्था यांच्यात माहिती प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जल व्यवस्थापन अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाअंतर्गत शाश्वत जल विकास या विषयावर अनेक वार्षिक परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियंते, शास्त्रज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ आदींसाठी अशा परिषदा जल व्यवस्थापनापुढील समस्या आणि भारतातील संधी या विषयावर सखोल चर्चा करण्याचे व्यासपीठ आहेत.

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने येत्या 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे दुसऱ्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, कॅनडा, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन, जर्मनी, थायलंड, श्रीलंका आणि नेपाळ या देशातील आंतरराष्ट्रीय तज्ञ सहभागी होत आहेत. या परिषदेत 12 सत्र होणार असून जलस्रोताशी संबंधित विविध विषयांवर चर्चाही होणार आहे.