‘बुलबुल’ चक्रीवादळाचे तीव्र स्वरूप, ओडिशा किनारपट्टी, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता.

नवी दिल्ली [] बंगालच्या उपसागरावर घोंघावणाऱ्या ‘बुलबुल’ चक्रीवादळाने अधिक तीव्र स्वरूप धारण केले असल्याने ओडिशा किनारपट्टी, नजीकचा परिसर आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

बुलबुल चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे, तरीही खबरदारीचे उपाय म्हणून राज्य सरकारने प्रशासकीय यंत्रणेला आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

बुलबुल चक्रीवादळ सध्या १३ कि.मी. वेगाने सरकत असून शनिवापर्यंत ते अधिक तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे, असे भुवनेश्वर हवामान विभागाचे संचालक एच. आर. विश्वास यांनी म्हटले आहे. ओडिशावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता कमी आहे, मात्र चक्रीवादळामुळे तटवर्ती क्षेत्रात आणि उत्तरेकडील जिल्ह्य़ात पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर ९ आणि १० नोव्हेंबरला पूर्व आणि पश्चिम भागांतील सागरी वाहतूक पूर्णत बंद ठेवण्यात आली आहे.