मुंबई – आपल्याला खोटे पाडण्यात आल्यानेच संवाद थांबविला – उद्धव ठाकरे.

मुंबई [] अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून आपल्याला खोटारडे ठरविण्याचा प्रयत्न काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानेच आपण भाजपबरोबरची सरकार स्थापनेची चर्चा थांबविली होती. जनतेला उल्लू बनविणाऱ्या आणि खोटे बोलणाऱ्यांशी अजिबात चर्चा करायची नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवला.

केंद्रीय मंत्रिमंडळात चांगले खाते देण्याचे आश्वासन देऊनही अवजड उद्योग हे खाते शिवसेनेला देण्यात आल्याचा आरोपही उद्धव यांनी केला. सरकार स्थापन न होण्याचे खापर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर फोडले होते. फडणवीस यांना लगेचच ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. सरकार स्थापण्याची चर्चा आपण थांबविली, असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णयच झाला नव्हता, हा फडणवीस यांचा दावा म्हणजे शुद्ध खोटारडेपणा आहे, असे ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले. यातून फडणवीस यांनी मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. सत्तावाटपात उजवे-डावे करता आले असते, पण आपल्याला खोटे पाडण्यात आल्यानेच संवाद थांबविला होता, असे उद्धव म्हणाले.