पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलणार

नवी दिल्ली []  लॉकडाऊन नंतर आता देशात अनलोकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचे दोन टप्पे झाले असून आता तिसऱ्या टप्प्याचा  विचार सुरू आहे. त्यातच देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  देशातल्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा बोलणार आहेत. येत्या सोमवारी (27 जुलै) ते सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मोठ्या घोषणेची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

देशात अनलोकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्थचक्र पुन्हा सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. पण अर्थव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता आता पुन्हा व्यापक लॉकडाऊन करण्यात येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं. आता यापुढे कसं जायचं. राज्यांना काय समस्या आहेत ते पंतप्रधान ऐकून घेणार असून पुढची दिशा ठरवली जाणार आहे.