कॅप्टनने सगळ्या टीमवर लक्ष द्यावं – शरद पवार

औरंगाबाद [] कॅप्टनने एका ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं, असं मत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. संकटकाळात शरद पवार हे सर्व ठिकाणी भेटी देतात. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर जात नाहीत असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॅप्टन असं संबोधित करत त्यांची पाठराखण केली. आज खासदार शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मला लोकांमध्ये जाण्याची आवड आहे. मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. त्यामुळेच मला राहावत नाही म्हणून मी संकटकाळातही बाहेर जात असतो असं पवार यावेळी म्हणाले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांनी कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. तसंच मुंबईत आल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले.