भारतात कोरोना बरे होण्याची टक्केवारी 64.25

जिनिव्हा []  जगात कोरोना व्हायरसचं थैमान थांबण्याचं नावच घेत नाही. गेल्या 6 आठवड्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीची बैठक बोलावली आहे. गुरुवारी ही बैठक होणार आहे. जगात 1 कोटी 60 लाख रुग्णांची संख्या झाली आहे. त्यात 6 लाख 53 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी ही बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत जगातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

WHOने कोरोनाला जागतिक महामारी घोषीत करण्यालाही आता 6 महिने होत असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या आजाराने जगातल्या देशांना आणि लोकांना जवळही आणलं आणि दूरही केलं. या आजाराने सगळं जगचं आता बदलून गेलं आहे असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे. या बैठकीनंतर WHO कुठली मार्गदर्शक तत्वे जाहीर करतं याकडे सर्व जागचं लक्ष लागलं आहे.

अमेरिकेत 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून. रिकव्हरी रेट 47.69 एवढा आहे. जगात ज्या देशांचा रिकव्हरी रेट उत्तम आहे अशा देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताची टक्केवारी ही 64.25 एवढी आहे.

जगाची रुग्ण बरे होण्याची सरासरी 61.20 टक्के एवढी आहे. त्या सरासरीपेक्षा भारताचं प्रमाण जास्त आहे. जगात 1 कोटी 65 लाख लोक कोरोनाबाधित आहेत. त्यात 57 लाखांपेक्षा जास्त लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर जगात 6 लाख 53 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.