अजित पवार यांचा कैलास गोरंट्याल यांना फोन

जालना [] उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोननंतर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपोषण रद्द केलं आहे. निधी वाटपाबाबत काँग्रेसच्या बाबतीत दुजाभाव होत असल्याचं सांगत पक्षाचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कैलास गोरंट्याल यांनी दिला होता. त्यानंतर अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. “आम्ही दुजाभाव करत नाही. परंतु यापुढे निधी वाटपाबाबत तुमचा प्राधान्याने विचार करु,” असं आश्वासन अजित पवार यांनी कैलास गोरंट्याल यांना दिल्याचं समजतं. त्यानंतर गोरंट्याल यांनी समाधान व्यक्त करत उपोषण रद्द करत असल्याचं सांगितलं.

जालना शहरासह मतदारसंघातील विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. निधीसाठी काँग्रेसच्या 11 आमदारांनी पाठपुरावा केला. मात्र, मागणीनुसार निधी काही मिळत नसल्यामुळे काँग्रेसमधील आमदार नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं होतं.

जालना जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात तीन नगरपालिका आहेत. यामध्ये अंबड, परतूर आणि जालना आहेत. जिल्ह्यातील नगरपालिकेसाठी आतापर्यंत 29 कोटी रुपयांचा निधी आला होता. मात्र काँग्रेसच्या नगरपालिकांना या निधीतून दमडीही दिली नसल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे. विशेष म्हणजे या बाबतीत शिवसेना नेते जिल्हाप्रमुखांच्या बाबतीत नरमाईचे धोरण बाळगत, निधीसाठी एका लेटरवर सुद्धा शिवसेना नेत्यांना प्राधान्य दिलं जात असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलं होतं.

 

All News