स्वराज्यध्वज यात्रेचे वेरूळ मध्ये जोरदार स्वागत.

औरंगाबाद [डॉ. सचिन साबळे ] स्वराज्य ध्वज मोहिमेने प्रवासाच्या बाराव्या दिवसात औरंगाबादमध्ये प्रवेश केला. राज्यातील तमाम जनतेचं लक्ष वेधून घेत हा अनोखा स्वराज्य ध्वज प्रवास मोहिमेच्या तिस-या टप्प्यात पोहोचलाय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली हि स्वराज्य ध्वज यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात आली असता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,औरंगाबाद जिल्हा आणि मावस बंधू प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या वतीने वेरूळ येथे स्वागत करण्यात आले व यासमयी ध्वज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी संतोष भाऊ  माने , गजानन फुलारे , अनिल चव्हाण , रावसाहेब फुलारे, ऋषिकेश फुलारे , अजिनाथ सालुंके , महेश पवार, पवन फुलारे,  कुणाल कदम पाटील, खुलताबाद तालुका अध्यक्ष ऋषीकेश फुलारे, अभिषेक फुलारे, पंकज कुलकर्णी, अजय कंदे,निखील वैध, वैभव खिल्लारे आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सतराहून अधिक  जिल्ह्यांतील हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी  जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला आहे. आता महाराष्ट्राबाहेर देखील ध्वज मोहिमेचा प्रवास सुरू झाला आहे.

सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे.

 

All News