आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 75,000 तरुण योगासने करणार : डॉ. एल. मुरुगन

नवी दिल्ली [ अंजली साबळे ] जगभरात 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. योग दिनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. माहिती आणि प्रसारण, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज कन्याकुमारी इथे विवेकानंद केंद्राच्या मैदानावर योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबर 2014 रोजी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या वर्षापासून गेली आठ वर्षे आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी साजरा केला जातो, असे मुरुगन यांनी सांगितले.

भारत या वर्षी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना, विविध मंत्रालये आणि विभागांद्वारे योग दिनाचा उलटगणती कार्यक्रम 75 दिवसांपासून आयोजित केला जात आहे.

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने योग दिवस उलटगणती कार्यक्रम आयोजित केला याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. आपल्या देशात सुरु झालेल्या योगचे आता जगभरात पालन केले जाते. रोज योगासन करून तरुण निरोगी राहू शकतात असे मुरुगन यांनी सांगितले.

येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरातील 75000 हून अधिक तरुण योगासने करतील, असे ते म्हणाले. कन्याकुमारी येथील कार्यक्रमात कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी अरविंद, नागरकोइलचे आमदार एम आर गांधीही सहभागी झाले होते.