सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर राष्ट्रीय परिषद

नवी दिल्ली [ डॉ. सचिन साबळे ] भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात भारताची प्रगती आणि यशस्वी कामगिरी साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश “स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव” साजरा करत आहे.

गृह मंत्रालयाने सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा (सायबर अपराध से आझादी – आझादी का अमृत महोत्सव) या विषयावरील राष्ट्रीय परिषद उद्या नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केली आहे. केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री अमित शाह या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. देशातील सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा ही परिषद एक भाग आहे.

गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने ही परिषद भरविली आहे.  यापूर्वी याच दोन मंत्रालयांनी विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 75 ठिकाणी 8 ते 17 जून दरम्यान सायबर स्वच्छता, सायबर गुन्हे प्रतिबंध, सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा याविषयी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. “आझादी का अमृत महोत्सव” बॅनरखाली हे कार्यक्रम झाले.

या परिषदेला केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री जी किशन रेड्डी, गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तसेच गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि इतर  संस्थांचे विविध प्रतिनिधी देखील उपस्थित राहतील.