चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या 42 व्या दीक्षांत समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

चेन्नई [ डॉ. सचिन साबळे ] तामिळनाडूचे माननीय राज्यपाल आर एन रवीजी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्री एल मुरुगनजी, इतर मंत्री आणि मान्यवर, अण्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर वेलराजजी, माझे तरुण मित्र, त्यांचे पालक आणि शिक्षक… अनैवरुक्कुम् वणक्कम् |

सर्वप्रथम, अण्णा विद्यापीठाच्या 42 व्या दीक्षांत समारंभात आज पदवीधर झालेल्या सर्वांचे अभिनंदन. तुम्ही आधीच तुमच्या मनात स्वतःसाठी भविष्याची योजना आखली असेल. त्यामुळे आजचा दिवस केवळ यशाचाच नाही तर आकांक्षांचाही आहे. आमच्या तरुणांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी माझी इच्छा आहे. अण्णा विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही हा विशेष काळ आहे. उद्याचे नेतृत्व घडवणारे तुम्ही राष्ट्रनिर्माते आहात. तुम्ही विद्यार्थ्यांच्या अनेक तुकड्यांचा प्रवास पाहिला असेल पण प्रत्येक तुकडी विशेष असते. प्रत्येक तुकडी स्वतःचा ठसा, त्यांच्या आठवणी मागे ठेवून जातात. आज जे पदवीधर होत आहेत त्यांच्या पालकांना मी विशेष शुभेच्छा देतो. तुमच्या मुलांच्या यशासाठी तुमचे त्याग महत्त्वाचे आहेत.

आपण आज, चेन्नईसारख्या चैतन्याने सळसळत्या शहरात आपल्या तरुणांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 125 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी मद्रास टाइम्सशी संवाद साधला होता. भारताच्या भविष्यासाठी तुमच्या योजना काय आहेत असे त्यांना विचारण्यात आले होते. ते म्हणाले होते: “माझा विश्वास तरुण पिढीवर आहे, आधुनिक पिढीवर आहे, त्यातून माझे कार्यकर्ते घडतील. ते सिंहाप्रमाणे संपूर्ण समस्यांचे निराकरण करतील.” त्यांचे म्हणणे आजही संयुक्तीक आहे. पण आता केवळ भारतच तरुणांकडे अपेक्षेने पाहत नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेने पाहत आहे. कारण तुम्ही देशाच्या विकासाचे इंजिन आहात आणि भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन आहे. हा एक मोठा सन्मान आहे. ही देखील एक मोठी जबाबदारी आहे, मला खात्री आहे की तुम्ही ती यशस्वीपणे पार पाडाल.

मित्रांनो,

तरूणाईत विश्वास व्यक्त करत असताना, भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांना कसे विसरता येईल. मला खात्री आहे की अण्णा विद्यापीठातील प्रत्येकासाठी ही अभिमानाची बाब आहे की डॉ. कलाम यांचा या विद्यापीठाशी जवळचा संबंध होता. मी ऐकले आहे की ते ज्या खोलीत राहिले होते त्याचे रूपांतर आता स्मारकात करण्यात आले आहे. त्यांचे विचार आणि मूल्ये आपल्या तरुणांना कायम प्रेरणा देत राहतील.

मित्रांनो,

तुम्ही विशेष काळात पदवीधर झाला आहात. काहीजण याला जागतिक अनिश्चिततेचा काळ म्हणतील. पण मी त्याला उत्तम संधीचा काळ म्हणेन. कोविड-19 महामारी ही एक अभूतपूर्व घटना होती. हे शतकातून एकदा येणारे अभूतपूर्व संकट होते. त्याबाबत कोणाकडेही निश्चित उपाय नव्हते. प्रत्येक देशाची या आजाराने परीक्षा घेतली. तुम्हाला माहिती आहेच की, आपण कोणत्या मातीचे बनलो आहोत, आपल्या क्षमता काय, याची पारख  संकटांतच होते. शास्त्रज्ञ, आरोग्यसेवा कर्मचारी, व्यावसायिक आणि सामान्य लोकांमुळे भारताने या  अज्ञात संकटाचा आत्मविश्वासाने सामना केला. परिणामी, आज भारतातील प्रत्येक क्षेत्राला नवसंजीवनी मिळत आहे. उद्योग असो, नवोन्मेष असो, गुंतवणूक असो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असो, भारत यात आघाडीवर आहे. आमचे उद्योग क्षेत्र प्रसंगानुरूप वाढले आहे. उदाहरणच द्यायचे तर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने. गेल्या वर्षी, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश ठरला. नवोन्मेष ही जीवन जगण्याची पद्धत बनत आहे. केवळ गेल्या 6 वर्षांत, मान्यताप्राप्त स्टार्ट-अप्सची संख्या पंधरा हजार टक्क्यांनी वाढली! होय, तुम्ही ते बरोबर ऐकले – पंधरा हजार टक्के. 2016 मधील फक्त 470 वरून ते आता जवळपास 73 हजार वर पोहचले आहेत! जेव्हा उद्योग क्षेत्र आणि नवोन्मेष चांगले काम करतात तेव्हा गुंतवणुकीचा प्रवाह आपोआप वाहू लागतो. गेल्या वर्षी, भारतात 83 अब्ज डॉलर्सची विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक झाली. आमच्या स्टार्ट अप्सनाही महामारीनंतर विक्रमी निधी मिळाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात, भारताची स्थिती आतापर्यंतची सर्वोत्तम स्थिती आहे. आपल्या देशाने वस्तू आणि सेवांची आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात नोंदवली आहे. जगासाठी बिकट काळ असताना आम्ही अन्नधान्याची निर्यात केली. आपण अलीकडेच आपल्या पश्चिमेला यु ए ई आणि आपल्या पूर्वेकडे ऑस्ट्रेलियाशी व्यापार करार केला. जागतिक पुरवठा साखळीतील भारत हा महत्त्वाचा दुवा बनत आहे. भारत अडथळ्यांचे संधींमध्ये रूपांतरित करत असल्याने आपल्याला आता सर्वाधिक प्रभाव पाडण्याची संधी आहे.

मित्रांनो,

तुमच्यापैकी बहुतेकांनी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित शाखांमध्ये शिक्षण घेतले आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव असलेल्या या युगात, तीन महत्त्वाचे घटक तुमच्यासाठी अनुकूल आहेत. पहिला घटक म्हणजे आज तंत्रज्ञानात गती आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सुखाची भावना वाढत आहे. अगदी गरिबातील गरीब लोकही त्याच्याशी जुळवून घेत आहेत. बाजार, हवामान आणि किमतीची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी अॅप्सचा वापर करतात. गृहिणी त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून मुले शिकत आहेत. छोटे विक्रेते डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. जर तुम्ही त्यांना रोख रक्कम दिली तर त्यांच्यापैकी काही तुम्हाला सांगतील की ते डिजिटल व्यवहार पसंत करतात. भारत, डिजिटल व्यवहार आणि फिनटेकमध्ये जागात आघाडीवर आहे. तंत्रज्ञानविषयक नवकल्पनांसाठी मोठी बाजारपेठ तुमच्या जादूई कामगिरीची वाट पाहत आहे.

दुसरा अनुकूल घटक म्हणजे जोखीम घेणाऱ्यांवर विश्वास टाकला जातोय. पूर्वी, सामाजिक कार्यक्रमात, तरुणांना तो किंवा ती उद्योजक आहे हे सांगणे कठीण जात असे. लोक त्यांना ‘स्थिरस्थावर हो’ म्हणजे पगाराची नोकरी मिळवा असे सांगत. आता मात्र परिस्थिती उलट आहे. लोक विचारतात की तुम्ही स्वतःहून काही सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे का! एखादी नोकरी करत असलात तरी स्टार्ट अपसाठी काम करणे अधिक प्रतिष्ठेचे आहे. जोखीम घेणाऱ्यांचा उदय म्हणजे तुमच्यासाठी दोन गोष्टी. तुम्ही स्वतः जोखीम घेऊ शकता. किंवा तुम्ही इतरांनी निर्माण केलेल्या संधींचा आधार घेऊ शकता.

तिसरा घटक म्हणजे सुधारणेची मानसिकता. पूर्वी अशी धारणा होती की एक मजबूत सरकार म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येकावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पण आम्ही हे बदलले आहे. मजबूत सरकार प्रत्येक गोष्टीवर किंवा प्रत्येकावर नियंत्रण ठेवत नाही. ते हस्तक्षेप करण्याच्या व्यवस्थेला नियंत्रित करते. मजबूत सरकार प्रतिबंधात्मक नसून प्रतिसाद देणारे असते. मजबूत सरकार प्रत्येक क्षेत्रात हस्तक्षेप करत नाही. ते स्वतःला मर्यादा घालते आणि लोकांच्या कलाकौशल्याना  वाव देते. मजबूत सरकारची ताकद ,”आपल्याला सर्व काही कळू शकत नाही किंवाआपण  ते करू शकत नाही’  हे स्वीकारण्याच्या नम्रतेमध्येच असते. यामुळेच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सुधारणा दिसत आहेत, यात लोकांच्या योगदानाचे आणि त्यांच्या दिलेल्या स्वातंत्र्याचे मोठे महत्त्व आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तरुणांना परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याचे अधिक स्वातंत्र्य सुनिश्चित करते. जवळपास 25,000 अनुपालने रद्द केल्याने राहणीमान सुलभ होत आहे. एंजल कर काढून टाकणे, पूर्वलक्षी कर काढून टाकणे आणि कॉर्पोरेट कर कमी करणे यामुळे गुंतवणूक आणि उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. ड्रोन, अवकाश आणि भू-स्थानिक क्षेत्रातील सुधारणा नवीन मार्ग खुले करत आहेत. पीएम गति शक्ती बृहद आराखड्याद्वारे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सुधारणा वेगाने आणि व्यापक प्रमाणात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहेत. तंत्रज्ञानाची गोडी, जोखीम घेणाऱ्यांवर विश्वास आणि सुधारणेची मानसिकता, हे सर्व घटक तुमच्यासाठी एक व्यासपीठ तयार करत आहेत, तिथे संधी निर्माण होतात, टिकतात आणि वाढतात.

मित्रांनो,

पुढील 25 वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंतचा हा अमृत काळ आहे. आम्ही नशीबवान आहोत की तुमच्यासारखे अनेक तरुण स्वतःचे आणि भारताचे भविष्य घडवणार आहेत. त्यामुळे तुमचा विकास हा भारताचा विकास आहे. तुमचे शिकणे हे भारताचे शिकणे आहे. तुमचा विजय हा भारताचा विजय आहे. म्हणून, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या योजना आखाल… लक्षात ठेवा की तुम्ही भारतासाठीही आपोआप योजना आखत आहात. ही एक ऐतिहासिक संधी आहे जी फक्त तुमच्या पिढीला मिळाली आहे. ती घ्या आणि त्यातून सर्वोत्तम घडवा! पुन्हा एकदा, अभिनंदन आणि शुभेच्छा!