शाश्वत स्वच्छतेत महाराष्ट्र अग्रेसर – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

मुंबई []  शाश्वत स्वच्छता ही काळाची गरज झाली आहे. राज्यात ‘दरवाजा बंद-2’ या अभियानाच्या जाहिरातीचा उपयोग स्वच्छतेच्या सुविधांचा नियमित वापर करण्यासाठी व शाश्वत स्वच्छतेसाठी होणार आहे. असे सांगून हागणदारीमुक्त महाराष्ट्र हा शाश्वत स्वच्छतेतही अग्रेसर राहणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे केले.

केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद 2’ या जाहिरात अभियानाचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. लोणीकर व महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला आहे. यावेळी श्री. लोणीकर बोलत होते. यावेळी केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, जागतिक बँकेचे हिशाम काहीन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. लोणीकर म्हणाले, देशाच्या प्रत्येक नागरिकांनी शाश्वत स्वच्छतेसाठी कामकरून भावी पिढीचे भविष्य अबाधित ठेवणे काळाची गरज आहे. अस्वच्छतेने अनेक आजार निर्माण होतात. त्याचा परिणाम देशाच्या आरोग्य आणि अर्थकारणावर होत असतो.

राज्यात गेली साठ वर्ष ग्रामीण भागातील लोक शौचालयासाठी उघड्यावर जात होते. गेल्या चार वर्षात हे चित्र बदलले असून राज्य हागणदारीमुक्त झालेले आहे. राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात 68 लाख शौचालय बांधले आहेत. या पूर्वीच्या दरवाजा बंद जाहिरातीचा आम्ही स्वच्छता प्रबोधनासाठी गावागावात उपयोग केला. अमिताभ बच्चन यांचा स्वच्छ भारत मिशनमधील सक्रिय सहभाग राज्याला उपयुक्त ठरला आहे. सरपंचापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि ग्रामसेवकापासून ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वांनी या अभियानात सहभाग घेतल्याने स्वच्छता जागृतीचे एक जनआंदोलन उभे राहिले.

 

शाश्वत स्वच्छतेसाठी बांधलेल्या शौचालयाचा उपयोग नियमित झाला पाहिजे यासाठी केंद्र सरकारने ‘दरवाजा बंद-2’ हे अभियान राबविले आहे. या अभियानासाठी गावागावात जनजागृती करताना अभिनेते अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी राज्यात आम्ही स्वच्छतेचा महाजागर सारखा उपक्रम जनतेच्या प्रबोधनासाठी राबविणार आहोत. राज्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, शालेय विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. प्रत्येक गावाचा शाश्वत स्वच्छतेचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे.

महानायक अमिताभ बच्चन म्हणाले, स्वच्छतेचे जे काम देशात झाले आहे त्याचे श्रेय गावागावात जाऊन काम करणाऱ्या स्वच्छागृहींचे आहे. स्वच्छतेच्या कामासाठी मी आणि माझा आवाज नेहमी तुमच्या सोबत राहील. या पूर्वी मी पोलिओ मुक्तीसाठी काम केले आहे. देश पोलिओ मुक्त झाला आहे, त्याप्रमाणेच स्वच्छ भारत मिशनमध्ये मी काम करत आहे. स्वच्छ भारत मिशनही पूर्ण होईल. लोकांनी आपला परिचय देताना ‘स्वच्छ तन,स्वच्छ मन, स्वच्छ भारत’, असा दिला पाहिजे.

जागतिक बँकचे हाशिम काहीन म्हणाले, समाजाच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. गेल्या चार वर्षात बदल दिसत आहे. या अभियानासाठी जागतिक बँक सहकार्य करीत आहे. त्यामुळे जागतिक बँक ही दरवाजा बंद-2 या अभियानाचा भाग आहे. यापुढेही जागतिक बँक स्वच्छ भारत मिशनसाठी सहकार्य करत राहील.

परमेश्वरन अय्यर म्हणाले, चार वर्षा पूर्वी देशात फक्त 39 टक्के शौचालय होते. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन राबविल्यानंतर मोठा बदल झाला असून आज देशात 98 टक्के शौचालय बांधून झाले आहेत. देशात 2 लाख 50 हजार ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग घेतला आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी देशभर दरवाजा बंद-2 हे जाहिरात अभियान राबवित आहोत.